शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बदलत्या जगानुसार संगणकाचे ज्ञान वृद्धिंगत करावे – दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.रमेशजी बियाणी
लातूर : आजचे युग विज्ञानतंत्रज्ञान,संगणक आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे युग आहे.या बदलत्या युगात संगणकाचे अद्ययावत ज्ञान शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्वांनीच वृद्धिंगत करावे.बदलत्या काळानुसार जग हे संपूर्ण क्षेत्रात बदलत आहे.म्हणूनच ईमेल,फेसबुक,इंटरनेट,व्हाट्सअप, संगणक आदींचा चांगला सद्पयोग करावे.कारण ज्ञानाचे भांडार अवाढव्य असून ते ज्ञान गुगल,इंटरनेट आणि ग्रंथाच्या माध्यमातून मिळते.त्याचे परिपूर्ण ज्ञान अवगत करून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीच नव्हे तर प्रत्येकांनी फाईल्स तयार करणे,डेटा सेव्ह करणे,एक्सेलमधील माहिती या संदर्भातील सर्व कामे करता आली पाहिजेत.दैनंदिन व्यवहार करत असताना आणि या जागतिकीकरणाच्या युगात ऑनलाईन व्यवहार,कार्यालयीन कामकाज करताना नवनवीन संकल्पना शिकून आनंदी जीवन जगले पाहिजे,असे प्रतिपादन दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांनी केले.
येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाच्या वतीने ‘ डेव्हलपिंग डिजिटल कल्चर अमाँग नॉनटिचिंग स्टॉफ ‘ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय कार्यशाळेची सांगता झाली.त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड होते.याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे संयुक्त सचिव सुरेशजी जैन,उपप्राचार्य डॉ.एस.एस. बेल्लाळे,कार्यशाळा समन्वयक व संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रोहिणी शिंदे,प्रा.संगीता जाजू यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी संयुक्त सचिव सुरेशजी जैन यांनी शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्वांनी डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगातील संगणकाचे परिपूर्ण ज्ञान अशा कार्यशाळेतून आणि तज्ज्ञ व्यक्तीकडून शिकून घ्यावे आणि जे ज्ञान मिळवलेले आहे ते उत्स्फूर्तपणे कृतीत आणि कार्यालयीन कामकाजात उपयोगात आणावे.यातूनच स्वतःचे,कॉलेजचे आणि संस्थेचे नावलौकिक होते,असे ते म्हणाले.
उपप्राचार्य डॉ.एस.एस.बेल्लाळे यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संगणकाचे कौशल्य आत्मसात करण्याबरोबर महाविद्यालयाचे नावलौकिक व नँकचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थी, पालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि कार्यालयीन कामकाज शिस्तबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड यांनी शिक्षकेत्तर कर्मचारी हा प्रशासनाचा मुख्य कणा असून त्यांनी संगणक आणि इंटरनेटचे परिपूर्ण ज्ञान अवगत केले पाहिजे.याचबरोबर त्यांनी विविध ट्रेनिंग कोर्स,कार्यशाळा,एफडीपी प्रोग्राम करावे.असे कार्य दयानंद शिक्षण संस्थेतील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी सातत्याने करतात,असे ते म्हणाले.
प्रास्ताविक डॉ.रोहिणी शिंदे यांनी केले तर आभार प्रा.कांचन कदम यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.निकिता शिंदे यांनी केले. यावेळी बी.जी.कांबळे,दिलीप राठोड,सुदर्शन सर्जे,एस.व्ही.हालसे,पूजा पाटील यांनी कार्यशाळेतील पाच दिवसीय अनुभव व्यक्त केले.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेतील सहभागी साधन व्यक्ती व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.याप्रसंगी नँक समन्वयक डॉ.रवींद्र सोळुंके,डॉ.युवराज सारणीकर,डॉ.ललित ठाकरे,डॉ.आण्णाराव चौगुले, कार्यालय अधीक्षक राजेश सेलूकर,संजय तिवारी,प्रा.एम.बी.सुगरे,प्रा.सुजाता काळे,प्रा.शुभांगी चिकराळे,नंदिनी जाधव,प्रियंका हिप्परकर,आर.एस.पवार,राहुल बनभेरू,चित्ते,एस.एम.सूर्यवंशी,अमोलवाजपाई,भालेराव,नागटिळक,
माळगे आदींसह प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.